एखादी वेबसाईट आवडली? मग त्याच प्रकारच्या दुसर्‍या वेबसाईट्स कशा शोधाल?

अनेकवेळा आपल्याला एका प्रकारची वेबसाईट आवडते आणि मग आपण आनंदाने ती जॉईन होतो, वापरु लागतो. कालांतराने आपण त्याठिकाणी रुळतो आणि मग नाविन्याची गरज भासू लागते. अशात शोध सुरु होतो तो त्याच प्रकारच्या एखाद्या निराळ्या साईटचा. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर ऑरकूटचं देता येईल. माझे अनेक मित्र ऑरकूटवर आहेत. आणि आता ते हळूहळू फेसबुकवरही अवतरु लागले आहेत. ऑरकूट आणि फेसबुक या दोनही सोशल नेटवर्कींग वेबसाईट्स जरी असल्या तरीही ते स्वतःत एक वेगळेपण राखून आहेत. त्या दोघांतही आपापलं नाविन्य हे आहेच. दोघांचा इंटरफेस निरनिराळा आहे, सोयी-सुविधा निरनिराळ्या आहेत. आणि म्हणूनच आपण एकाच प्रकारच्या दोनही वेबसाईट्स अगदी आनंदाने जॉईन होतो. याशिवाय कधीकधी एखादी वेबसाईट आपल्याला जे ‘नेमकं’ हवं आहे ते देण्यात कमी पडते, अशावेळीही आपणास त्याच प्रकारच्या एखाद्या दुस-या वेबसाईटची गरज भासते.


एकाच प्रकारचे उद्दिष्ठ ठेवून निर्माण करण्यात आलेल्या वेबसाईट्स फार आहेत. पण त्या आहेत! हे तरी आपणास कळणार कसं? आणि नेमकी हिच आयडीया उचलून धरत ‘सिमिलर साईट्स’ सर्च इंजनची निर्मिती करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या सर्च इंजनमध्ये तुम्ही एखाद्या वेबसाईटचा पत्ता टाकता आणि मग सर्च रिझल्ट्स म्हणून तशाच प्रकारच्या इतर वेबसाईट्स दृष्टिपथात येतात. समांतर वेबसाईट्सचा शोध घेण्यासाठी मी दोन सर्च इंजिन्सची शिफारस करेन. एक आहे या इथे आणि दुसरे आहे या इथे. या सर्च इंजिन्सचा वापर केल्याने तुमच्या नेट सर्फिंगच्या अनुभवात नवचैतन्य संचारेल यात काहीच शंका नाही.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.