ऑर्कुट कम्युनिटी, समुदाय तयार करा

रं तर बर्‍याच जणांना ऑर्कुट कम्युनिटी तयार करण्याबाबत माहित असेलच, पण आजचा लेख त्यांच्यासाठी आहे, जे इंटरनेट वापरण्यात एक्सपर्ट नाहियेत आणि जे ऑर्कुटला अलिकडेच जॉईन झाले आहेत. ऑर्कुटवर कम्युनिटी तयार करणं म्हणजे थोडक्यात एक समविचारी समुदाय एकत्र करण्यासारखं आहे, ज्या समुदायाचे संस्थापक तुम्ही आहात. असा समुदाय तयार करण्याची सोय उपलब्ध करुन देणार्‍या चिक्कार वेबसाईट्स जालावर इतस्तः विखुरलेल्या आहेत. पण त्यांची समस्या ही आहे की, तिथे नव्याने खातं उघडण्यास आपले मित्र सहजासहजी तयार होत नाहीत. याऊलट ऑर्कुट, फेसबुक सारख्या वेबसाईट्सवर आधिपासूनच आपल्या मित्रांचे खाते असते. त्यामुळे त्या तिथे आपण एखादा समुदाय सुरु केला, तर ते त्यात लगेच सहभागी होऊ शकतात. यानिमित्ताने मला मागे लिहिलेल्या ‘गुगल ग्रुप्स’ वरील लेखाची आठवण झाली. तिथेही तुम्ही ऑर्कुट, फेसबुक प्रमाणेच ग्रुप तयार करु शकता.

समुदाय, समूह तयार करा

तर आपण ऑर्कुटबाबत बोलत होतो. ऑर्कुटवर कम्युनिटी, समुदाय तयार करण्यासाठी असं करता येईल …
१. ऑर्कुट.कॉम वर जा. (मी मराठी ऑर्कुटप्रमाणे पुढील पायर्‍या सांगत आहे.)
२. वरच्या मेनूबारमधून समुदाय वर क्लिक करा.
३. आता तुमच्या प्रोफाईल फोटोखाली ‘समुदाय तयार करा’ नावाचे बटण दिसेल! त्यावर क्लिक करा.
४. ‘तुम्ही खरेच अस्तित्त्वात आहात का?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, दिलेली इंग्रजी मुळाक्षरे जशी आहेत तशी त्यावर असलेल्या रिकाम्या चौकटीत टाका. आणि ‘पुष्टी करा’ या बटणावर क्लिक करा.
५. आता एक फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तुमच्या समुदायाचे नाव दिलेल्या जागेत लिहा, प्रवर्ग निवडा, वर्णन करा, सामग्री गोपनीयते बाबत सांगा, सहभागी होण्यास तुमची परवाणगी आवश्यक आहे की नाही!? ते सांगा. त्या फॉर्म अंतर्गत विचारल्याप्रमाणे माहिती भरत जा. सुरुवातीला चर्चामंच, मतदान आणि कार्यक्रम सर्व काही सक्षम असू द्या. हवं असल्यास नंतर तुम्ही त्यात आवश्यक तो बदल करु शकता.
६. आणि मग शेवटी ‘समुदाय तयार करा’ या बटणावर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचा स्वतःचा समुदाय तयार झाला आहे!

आता आपण या समुदायाची वैशिष्टये पाहुयात.

चर्चामंच : चर्चामंच्याच्या सहाय्याने तुमच्या समुहातील सभासद एकमेकांशी एखाद्या विषयावर चर्चा करु शकतात. म्हणजे समजा तुमचा समूह क्रिकेट संदर्भात आहे, तर तुमचे समूह सभासद टि२० वल्डकपमधील भारताच्या पराभवावर चर्चा करु शकतात.

मतदान : मतदानाबाबत अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एक प्रश्न तयार करा आणि त्याच्या उत्तरादाखल काही पर्याय द्या. तुमचे समूह सभासद तुम्ही दिलेल्या पर्यायांपैकी एकाची निवड करुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील. यातून एखाद्या गोष्टीबाबत नेमके जनमत काय आहे!? ते आपल्याला समजू शकेल. उदा. टि२० वल्डकपमधील भारताच्या पराभवाला जबाबदार कोण? १. कर्णधार २. निवड समिती ३. प्रशिक्षक. अशाप्रकारचे पोल तयार करुन तुम्ही मतदान घेऊ शकता.

कार्यक्रम : राजसाहेब ठाकरेंच्या ऑर्कुट कम्युनिटीवरील सभासद मित्र नेहमीच एकमेकांशी भेटून काही विधायक कार्य करण्याबाबत चर्चा करत असतात. अशावेळी ते ‘कार्यक्रम’ या सुविधेचा उपयोग करुन, भेटायची वेळ, तारिख, ठिकाण आणि इतर सर्व तपशील समुदायातील बाकी सर्व मित्रांना कळवू शकतात.

ऑर्कुट कम्युनिटी हे स्वतःला व्यक्त करुन संघटीतपणे काही करण्यासाठीचे योग्य असे माध्यम आहे. तुमच्या मनातही काही प्रेरक विचार असतील किंवा एखाद्या गोष्टीची साधीसोपी आवड असेल, तर तुम्ही देखील अशा एका ऑर्कुट समुदायाचे संस्थापक बनू शकता.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.