क्लाऊड स्टोअरेज म्हणजे काय?

‘क्लाऊड स्टोअरेज’ या शब्दप्रयोगातील ‘क्लाऊड’ चा अर्थ आकाशातील ‘ढग’ असा होत नाही. त्यामुळे यातील ‘क्लाऊड’ या शब्दाला आपण बाजूला ठेवूयात. ‘स्टोअर करणे’ म्हणजेच ‘साठवणे’. ज्या ठिकाणी काहीतरी साठवले जाते त्यास ‘स्टोअरेज’ असे म्हणतात. आपण मोबाईलवरुन जो फोटो काढतो, तो कुठे साठवला जात असेल? तो आपल्या फोनच्या ‘डेटा स्टोअरेज’ मध्ये साठवला जातो. ‘डेटा’ म्हणजेच ‘उपयुक्त माहिती’. उपयुक्त माहिती जिथे साठवली जाते त्यास ‘डेटा स्टोअरेज’ असे म्हणतात.
‘मेमरी कार्ड’ हे डेटा स्टोअरेजचे एक उदाहरण आहे. मेमरी कार्डवर आपण फोटो, व्हिडिओ, गाणी, डॉक्युमेंट, इत्यादी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती साठवत असतो. मात्र ‘स्टोअरेज’चे (साठवणूकीचे) कोणतेही साधन (जसे की, मेमरी कार्ड) हे आपल्या क्षमतेनुसार मर्यादित प्रमाणातच डेटा (जसे की, फोटो, गाणी, इ.) साठवू शकते. उदाहरणार्थ, १६ जीबी च्या ‘मेमरी कार्ड’वर आपण त्याहून अधिक माहिती साठवू शकत नाही. त्याहून अधिक माहिती साठवायची असेल, तर ३२ जीबी चे मेमरी कार्ड असायला हवे.
‘क्लाऊड स्टोअरेज’ ही संकल्पना अगदी ‘डेटा स्टोअरेज’ (जसे की, मेमरी कार्ड) प्रमाणेच आहे. ‘क्लाऊड स्टोअरेज’ हा डेटा स्टोअर करण्याचाच एक प्रकार आहे. ‘मेमरी कार्ड’ आपले स्वतःचे असते आणि ‘क्लाऊड स्टोअरेज’ आपण भाड्याने घेतो, इतकाच काय तो फरक आहे. त्यामुळे सहाजिकच एक प्रश्न निर्माण होतो की, ‘क्लाऊड स्टोअरेज’ आपण कोणाकडून भाड्याने घेतो? गूगल, मायक्रोसॉफ्ट, ड्रॉपबॉक्स, कॉपी अशा अनेक कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ‘क्लाऊड स्टोअरेज’ भाड्याने देतात. मात्र ‘मेमरी कार्ड’ प्रमाणेच ‘क्लाऊड स्टोअरेज’ मध्ये डेटा स्टोअर करण्याची एक मर्यादित क्षमता असते. उदाहरणार्थ, १५ जीबी च्या ‘क्लाऊड स्टोअरेज’ वर आपण त्याहून अधिक माहिती साठवू शकत नाही. त्याहून अधिक माहिती साठवायची असेल, तर आणखी जास्त क्षमतेचे ‘क्लाऊड स्टोअरेज’ भाड्याने विकत घ्यावे लागेल.

क्लाऊड स्टोअरेज
ड्रॉपबॉक्स क्लाऊड स्टोअरेज

समजा आपला मोबाईल फोन उद्या काही कारणाने खराब झाला किंवा हरवला, तर काय? त्या फोनमधील सर्व फोटो, व्हिडिओ, गाणी, इत्यादी डेडा आपल्याला गमवावा लागेल. अशाप्रकारे आपण साठवलेली माहिती नाहिशी होणं हे नुकसानकारक आणि दुःखदायक ठरु शकतं. त्यामुळे आपल्या फोनच्या ‘मेमरी कार्ड’ वर आपण जी माहिती साठवली आहे, ती आणखी एखाद्या ठिकाणी साठवून ठेवने हिताचे ठरते. अशावेळी फोनच्या ‘मेमरी कार्ड’ वरील माहिती आपण कॉपी करुन आपल्या संगणकावरील ‘हार्ड डिस्क’ वर घेऊ शकतो. मूळ फाईल पूर्ववत ठेवून त्या फाईलची नक्कल दुसरीकडे साठवून ठेवणे (अर्थात, कॉपी करणे) यास ‘बॅकअप’ (Backup) घेणे असे म्हणतात. ‘हार्ड डिस्क’ हा देखील ‘डेडा स्टोअरेज’चाच एक प्रकार आहे. त्यामुळे आपला फोन जरी खराब झाला अथवा हरवला, तरी त्यावरील माहिती ही संगणकावर सुरक्षित राहते. पण मग संगणकही खराब झाला किंवा हरवला तर? मोबाईल किंवा संगणक यावरील डेटा हा पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री देता येत नाही. शिवाय एकच फाईल ही सुरक्षेसाठी मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी ठेवावी लागत असल्याने अतिरीक्त मेमरी देखील वाया जाते. यावर उपाय म्हणून एक स्वतंत्र हार्ड डिस्क विकत घेता येईल आणि त्यावर मोबाईल व संगणकातील माहिती बॅकअप घेऊन साठवता येईल. पण यात दोन समस्या आहेत. 
१. आपला मोबाईल व संगणक यात जवळपास रोजच नवनवीन माहितीची (डेडा) भर पडत असते. उदाहरणार्थ, समजा काल मी हार्ड डिस्क वर माझ्या मोबाईलवरील सर्व फोटोंचा बॅकअप घेतला आणि आज पुन्हा नव्याने मोबाईलवर काही चांगले फोटो काढले. तर आज काढलेल्या फोटोंच्या सुरक्षिततेचे काय? त्यासाठी आज मला पुन्हा नव्याने बॅकअप घ्यावा लागेल. अशाने सतत बॅकअप घेणे ही एक मोठीच डोकेदुखी ठरेल.
२. समजा मी बाहेरगावी आहे. माझ्या संगणकावर, हार्ड डिस्कवर एक महत्त्वाची फाईल आहे, ती मला हवी आहे. मोबाईल (स्मार्टफोन) तर माझ्याकडे आहे, पण ती फाईल त्यावर नाहीये. कारण मोबाईलची मेमरी संपत आल्याने काही दिवसांपूर्वीच मी ती फाईल त्यातून काढून टाकली होती. अशावेळी काय करणार? प्रत्येक महत्त्वाच्या फाईलच्या (फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, इत्यादी) तीन प्रती तयार करुन दरवेळी त्या मोबाईल, संगणक व हार्ड डिस्क वर ठेवणे अवघडच आहे! नाही का!?
अशावेळी ‘क्लाऊड स्टोअरेज’ या संकल्पनेची प्राकर्षाने गरज जाणवते. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे आपला महत्त्वाचा डेटा साठवण्यासाठी ‘इंटरनेटच्या माध्यमातून’ भाड्याने घेतलेल्या जागेस ‘क्लाऊड स्टोअरेज’ असे म्हणतात. यात ‘इंटरनेट’ हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण ‘इंटरनेट’ शिवाय ‘क्लाऊड स्टोअरेज’ ही संकल्पनाच साकार होऊ शकत नाही. गूगल, मायक्रोसॉफ्ट, ड्रॉपबॉक्स, कॉपी अशा कंपन्या आपणास ‘क्लाऊड स्टोअरेज’ साठी जागा भाड्याने देतात. पण मग जागा भाड्याने देतात म्हणजे नक्की काय करतात? तर आपला डेडा त्यांच्या डेटा सेंटर मधील हार्ड डिस्कवर साठवून ठेवण्याची अनुमती ते आपणास देतात. डेटा सेंटर हे एखाद्या गोदामासारखे असते, जिथे हार्ड डिस्कवर जगभरातील लोकांची माहिती साठविली जाते. आपला डेडा आपण त्यांच्या हार्ड डिस्कवर कसा साठवणार? हे काम आपणास इंटरनेटच्या माध्यमातून करता येते. हे सर्व नीट समजून घेण्यासाठी आपण ‘गूगल ड्राईव्ह’ या ‘गूगल’च्या ‘क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस’ चे उदाहरण घेऊ.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.