गुगल बझ – गुगलची नवीन सेवा

आज सकाळी जी-मेल ओपन केला आणि मला ‘गुगल बझ’ ला जी-मेल मध्ये जोडण्याबाबत विचारण्यात आलं. मी म्हटलं ‘पाहुयात तरी… गुगल यावेळी आपल्यासाठी काय नवीन घेऊन आलं आहे ते!’ गुगलची सेवा म्हटलं की काहितरी खास आणि युजर फ्रेंडली असणारच याची मनोमन खात्री असते शिवाय त्यामुळेच मनात एक उस्तुकताही लागून राहिलेली असते. खरं तर कालच मला एका चॅनलवर ‘गुगल बझ’ दिसले. आणि मग मी लगेच सर्चमधून ‘गुगल बझ’ शोधून काढले. ते मी माझ्या जी-मेल मध्ये ऍड सुद्धा केले…पण त्यावेळी ते झालं नाही. आणि आज अचानकच ते जोडण्याबाबत मला विचारणा करण्यात आली. मी आनंदाने होकार दिला.

‘गुगल बझ’ जोडल्यानंतर inbox च्या खाली तुम्हाला buzz हे बटण दिसून येईल. हे ऍप्लिकेशन काहिसं ‘ट्विटर’ सारखं आहे. म्हणजे जिथं आपण आपले अपडेट्स सांगत राहतो. खरडण्यासाठी दिलेल्या मोकळ्या जागेत तुम्ही काही लिहू शकता, फोटो टाकू शकता अथवा एखादी लिंकही देऊ शकता.

ट्विटर सारखंच तुम्हाला फॉलो करणारे लोक हे followers मध्ये दिसतील आणि तुम्ही ज्यांना फॉलो करत आहात ते following मध्ये. तुमच्या जी-मेलच्या ऍड्रेस बुक मधल्या मित्रांना तुम्ही बाय डिफॉल्ट फॉलो करत असाल आणि तेही तुम्हाला फॉलो करत असतील. बाकी नंतर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तिला unfollow करायचे असेल तर तेही तुम्ही अगदी सहजगत्या करु शकता. तुम्ही जी पोस्ट टाकत आहात ती सगळ्यांना दिसावी की, फक्त तुम्ही निवडलेल्या व्यक्तिंना, ते ठरवणंही तुमच्याच हतात असणार आहे. याशिवाय ‘गुगल बझ’ला तुम्ही तुमचा ब्लॉग अथवा वेबासाईट जोडू शकता. असं केल्याने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाकलेल्या नवीन पोस्टची शॉर्ट फिड क्षणार्धातच तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहचेल. तसंच twitter, picasa, flickr हेही तुम्हाला जोडता येणार आहेत. तुमच्या मित्राने जो ‘अपडेट’ टाकला असेल त्याच्याखाली त्याला रिसपॉन्स देण्यासाठी comment, like आणि email असे तीन ऑपशन्स असणार आहेत. त्यामुळे सारं काही व्यवस्थीत आणि सुटसुटीत आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण आज आधीच इतके सारे सोशल नेटवर्कस असताना… या आणखी एका सोशल नेटवर्कची खरंच गरज होती का? हाही मला पडलेला एक प्रश्न आहे. “गुगल बझ” चा एकच प्लस पॉईंट म्हणता येईल आणि तो म्हणजे ‘गुगल बझ’ आपण ‘जी-मेल’ ला जोडून वापरणार आहोत. आता ‘गुगल बझ’ प्रत्यक्षात लोकांच्या पसंतीस कितीपत उतरतो, हे तर येणारा काळच ठरवेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.