गुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी

साधा-सोपा युजर फ्रेंडली इंटरफेस आणि अतिशय उपयुक्त सेवा, ही गुगलची ठळक दोन वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. गुगलच्या भारतीय लॅबने अशीच एक उत्तम सेवा आता आपल्या भेटीसाठी आणली आहे, तिचं नाव आहे, ‘गुगल म्युझिक’. ‘गुगल म्युझिक’ वापरुन आपण नवी, जुनी अशी असंख्य हिंदी गाणी ऑनलाईन ऐकू शकतो. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही. वापरकरत्यांना ऑनलाईन मोफत गाणी ऐकता यावीत यासाठी गुगलने in.com, saavn.com आणि saregama.com या वेबसाईट्सची मदत घेतल्याचे दिसून येतंय. अर्थात प्रत्यक्षात in, saavn, saregama या वेबसाईट्सवर जाऊनदेखील आपण ऑनलाईन संगिताचा आनंद घेऊ शकतो. पण गुगलचा जाहिरातींशिवाय असलेला साधा-सोपा इंटरफेसच ऑनलाईन गाणी ऐकण्याबाबत उजवा वाटतो.

‘गुगल म्युझिक’ या सेवेचा आनंद घेण्यासाठी आपण या इथे क्लिक करु शकता. वर सांगितल्याप्रमाणे ‘गुगल म्युझिक’ हे गुगलच्या भारतीय लॅबचे उत्पादन आहे. गुगल म्युझिकच्या पानावर गेल्यानंतर आपल्याला त्या तिथे एक सर्च बॉक्स दिसून येईल. तिथे आपण कलाकाराचे नाव, सिनेमाचे नाव, अल्बमचे नाव किंवा प्रत्यक्षात एखाद्या गाण्याचे नाव टाकून हव्या त्या आवडीच्या गाण्याचा शोध घेऊ शकतो. सर्च बॉक्सच्या खाली अगदी अलिकडच्या काळातील सिनेमांची गाणी ऐकण्याबाबतची सोय करुन देण्यात आली आहे.

गुगल म्युझिक – hum tum या शब्दासाठी ९० च्या दशकात सिमित केलेला शोध

‘गुगल म्युझिक’च्या सर्च बॉक्समधून गाण्याशी संबंधीत एखाद्या शब्दाचा शोध घेतल्यानंतर पुढच्या पानावर आपल्याला शोध परिणाम दिसून येतील. यावेळी आपण त्या पानाच्या डाव्या बाजूला साईडबारमध्ये पाहिल्यास आपल्याला काळानुरुप गाणे निवडण्याचे स्वातंत्र्य दिसून येईल. उदाहरणार्थ, मी सर्च बॉक्स मध्ये ‘hum tum’ असं टाईप करुन शोध घेतल्यानंतर येणारं पान हे अनेक शोध परिणाम घेऊन आलं. त्यात अगदी जुन्या काळापासून ते आजपर्यंतच्या गाण्यांचा समावेश होता. आता मी डाव्या बाजूच्या साईडबारमधून 90’s वर क्लिक केलं, अशावेळी शोध परिणाम हे 9० च्या दशकातील गाण्यापर्यंतच सिमित राहिले. अगदी असंच old, 70’s, 80’s, 2000’s, This year या पर्यायांचा वापर करुन आपण गाण्यांचे शोध परिणाम ठराविक कालखंडामध्ये सिमित करु शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आवडीचं गाणं शोधणं हे अधिक सोपं जाणार आहे. काही लोकांना ठराविक कालखंडातील (कदाचीत ते प्रेमात पडले त्या काळातील) गाणी ऐकणंच जास्त पसंद असतं. अशा लोकांनादेखील याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

प्ले बटण

‘गुगल म्युझिक’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जेंव्हा एखाद्या गाण्याचे ‘प्ले बटण’ दाबतो, त्यावेळी एक लहानशी नवीन विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये ते गाणे सुरु होण्यासाठी, ऐकू येण्यासाठी आवश्यक असा ‘म्युझिक प्लेअर’ असतो. या म्युझिक प्लेअरवरील बटणांच्या सहाय्याने आपण गाण्याचा आवाज कमी-जास्त करु शकतो अथवा ते गाणे पुढे-मागे ढकलू शकतो. हे गाणे नवीन विंडोत सुरु असल्याने, आपण आपल्या मुख्य ब्राऊजरमध्ये गाण्याचा आनंद घेत घेत विनाअडथळा आपले नेट सर्फिंगचे कामही सुरु ठेऊ शकतो. एकंदरीत सांगायचं झालं, तर ‘गुगल म्युझिक’ ही साधी-सोपी मोफत ऑनलाईन हिंदी गाण्यांचा आनंद देणारी सुविधा आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.