ब्लॉगर ब्लॉगचे सर्व लेख आणि टेम्प्लेट कसे साठवाल? ब्लॉगर बॅकअप

रवा ‘स्टार माझा’ च्या समारंभावेळी ब्लॉगर्सशी गप्पा मारत असताना माझ्या हे लक्षात आलं की, अनेक ब्लॉगर्सना ब्लॉगरवरील लेखांचा बॅकअप कसा घ्यायचा? हे माहित नाही. मग ते आपला लेख कॉपी आणि पेस्ट करुन संगणकावर साठवून ठेवतात किंवा स्वतःलाच आपल्या लेखाचा ईमेल पाठवून देतात, जेणेकरुन तो इनबॉक्स मध्ये साठवला जाईल. हे पर्यायही वाईट नाहीत, पण यापेक्षा खूपच सोपा उपाय ब्लॉगरने फार पूर्वीपासूनच आपल्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. याचा वापर करुन आपण ब्लॉगर ब्लॉग वर लिहिलेल्या सर्व लेखांचा काही क्षणात आपल्या संगणकावर बॅकअप घेऊ शकतो. आपल्या ब्लॉगर ब्लॉगचे वर्डप्रेसवर किंवा इतर ब्लॉग प्लॅटफॉर्मवर स्थलांतर करत असताना देखील आपण या पर्यायाचा उपयोग करु शकतो. यशिवाय आपल्या ब्लॉगर टेम्प्लेटचा बॅक अप कसा घ्यायचा!? हे देखील आज आपण पाहणार आहोत.

ब्लॉगर ब्लॉग वरील लेख कसे साठवाल?
१. ब्लॉगर ब्लॉगवरील लेख साठवण्यासाठी सर्वप्रथम आपण ब्लॉगर.कॉम वर जाऊयात.
२. आपल्याला ज्या ब्लॉगवरील लेख साठवायचे आहेत, त्या ब्लॉगच्या ‘Design’ विभागात शिरा.
३. त्यानंतर वरच्या बार मधून settings वर क्लिक करा.
४. क्लिक केल्यानंतर जे पान उघडले जाईल, त्या पानाच्या सुरुवातीला Blog Tools समोर Import Blog, Export Blog, Delete Blog हे पर्याय आपल्याला दिसत असतील. त्यापैकी Export Blog वर क्लिक करा.

ब्लॉगर ब्लॉग लेख साठवा
संगणकावर सर्व लेख डाऊनलोड करुन घ्या

५. त्यानंतर उघडल्या गेलेल्या पानावर आपल्याला Download Blog नावाचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. असं केल्याने आपल्या ब्लॉगवरील लेख आपल्या संगणकावर xml फाईल फॉरमॅटमध्ये साठवले जातील.
६. वर्डप्रेसवरील import या पर्यायाचा वापर करुन आपण ही xml फाईल तिकडे अपलोड करुन आपला ब्लॉग वर्डप्रेसवर हलवू शकतो किंवा ब्लॉगर वरच दुसर्‍या एखाद्या ब्लॉगचा Import पर्याय वापरुन आपण आपला हा ब्लॉग त्या नवीन ब्लॉगवर हलवू शकतो.
७. जोपर्यंत ही xml फाईल आपल्या संगणकावर साठवलेली असेल, तोपर्यंत आपल्या लेखांचा बॅकअप आपल्याकडे आहे, असं म्हणायला हरकत नाही. नवनवीन लेख लिहित असताना वेळीवेळी असा बॅकअप घेत चला.

ब्लॉगर ब्लॉगचे टेम्प्लेट कसे साठवाल?
१. सर्वप्रथम ब्लॉगर.कॉम वर जा.
२. ज्या ब्लॉगचे टेम्प्लेट साठवायचे आहे, त्या ब्लॉगच्या ‘Design’ विभागात शिरा.

डिझाईन आणि त्यातील HTML एडिटर

३. तिथून वरच्या बार मधून ‘Edit HTML’ वर क्लिक करा.
४. उघडल्या गेलेल्या पानावर ‘Download Full Template’ अशी जी लिंक दिसत आहे, त्यावर क्लिक करुन त्यासंदर्भातील फाईल आपल्या संगणकावर साठवा.

ब्लॉगर ब्लॉग वरील लेखांचा आणि टेम्प्लेटचा बॅकअप आपण आपल्या संगणकावर घेतला आहे. याचाच अर्थ असा झाला की, आपला ब्लॉग आता पूर्णपणे सुरक्षीत आहे. आपल्या संगणकावर आपल्या ब्लॉगच्या नावाने ‘लेख’ आणि ‘टेम्पेट’ यांसाठी एक स्वतंत्र फोल्डर तयार करा. संगणकावर वेळोवेळी लेखांचा आणि टेम्प्लेटचा बॅकअप घेत असताना डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव बदलून त्यात बॅकअप केला त्या तारखेचा आणि वेळेचा जरुर समावेश करावा. जेणेकरुन आपल्या ब्लॉगला बॅकअप देण्यात एक शिस्तबद्धता निर्माण होईल, आणि भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास आपला गोंधळ उडणार नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.