ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?

ज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. मी देखिल माझ्या मित्रांना माझ्या ब्लॉग बद्दल सांगतो, तेंव्हा ते मला सर्वात आधी हाच मूळ प्रश्न विचारतात की, ब्लॉग कसा तयार करायचा? संगणक समोर नसताना मी त्यांना इतकंच सांगतो, की blogger.com वर जा, तिथे काही साध्या-सोप्या मोजक्याच पायर्‍या सांगितल्या आहेत, त्या वाचून त्याप्रमाणे करत गेलात, की लगेच तुमचाही एक ब्लॉग तयार होईल. पण यापुढे जर मी ऑनलाईन असताना मला कोणी विचारलं की, ब्लॉग कसा तयार करायचा? तर मी त्यांना माझ्या या लेखाचा दुवा देईन, जेणेकरुन त्यांना त्यांचा स्वतःचा ब्लॉग अगदी सहजगत्या तयार करता येईल. आणि आपले विचार, कल्पना, ज्ञान जगासोबत वाटून आपण काही करत आहोत याचे समाधान त्यांना मिळेल.

ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?
१. सर्वप्रथम गुगलच्या blogger.com या साईटवर आपल्याला त्यासाठी जावं लागेल.
२. चित्रात दाखवल्याप्रमाणे Get Started वर क्लिक करा.
ब्लॉग तयार करण्यासाठी इथून सुरुवात करा
३. आपण जीमेल, ऑर्कुट इ. कोणतीही गुगलची सेवा वापरत आहात का? म्हणजेच आपलं गुगल खातं, गुगल अकाऊंट आहे का? नसेल, तर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पान आपल्याला दिसेल, त्यात आवश्यक ती माहिती भरुन सर्वप्रथम आपलं एक गुगल खातं तयार करा. मोठ्या आकारात पाहण्यासाठी खालिल चित्रावर क्लिक करा.
गुगल अकाऊंट तयार करा
ब्लॉग तयार करण्यासाठीच्या तीन साध्या-सोप्या पायर्‍यांपैकी ‘गुगल अकाऊंट’ तयार करण्याची पहिली पायरी आपण पूर्ण केली आहे.
४. आता ब्लॉग तयार करण्यासाठीची दुसरी पायरी आपण पूर्ण करणार आहोत.
लोक आपल्या ब्लॉगला ओळखणार कसे? आणि ते आपल्या ब्लॉग पर्यंत पोहचणार कसे? लोकांनी आपल्या ब्लॉगला ओळखावं आणि त्यांनी आपल्या ब्लॉगपर्यंत पोहचावं यासाठी आपण आपल्या ब्लॉगला एक नाव देणार आहोत, शिवाय त्या ब्लॉगला एक पत्ता देणार आहोत. जसं आपल्या घराला एक नाव असतं, नंबर असतो आणि घरापर्यंत पोहचायचा एक पत्ता असतो. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे दिलेल्या जागा भरुन CONTINUE वर क्लिक करा.
ब्लॉगला नाव आणि पत्ता द्या
५. आपला ब्लॉग कसा दिसावा असं आपल्याला वाटतं? ते आपण तिसर्‍या पायरीमध्ये ठरवणार आहोत. यात आपल्यासमोर काही टेम्प्लेट्स सादर केले जातील. टेम्प्लेट म्हणजे एकंदरीत आपला ब्लॉग कसा दिसेल!? याबाबतचं स्वरुप, रचना. घराचंच उदाहरण घेतलं, तर आपलं घर कसं दिसावं?, ते कसं असावं? याबाबत आपल्या काही कल्पना असतात की नाही! प्रत्येकाचं घर सारखं असत नाही. त्याचप्रमाणे प्रत्याकाचा ब्लॉग हा ब्लॉगच असला, तरी तो प्रत्येकाच्या टेम्प्लेट निवडीनुसार वेगवेगळा दिसू शकतो.
एकदा निवडलेलं टेम्प्लेट आपण पुढे कधीही, केंव्हाही आणि कितीही वेळा बदलू शकतो. म्हणजेच आज आपल्याला वाटलं की, आपला ब्लॉग असा दिसावा, उद्या वाटलं तसा दिसावा, तर आपण कधीही आपल्या ब्लॉगचे टेम्प्लेट बदलून त्याची रचना, स्वरुप बदलू शकतो. त्यामुळे अगदी निःश्चिंतपणे समोरील कोणत्याही एका टेम्प्लेटची निवड करुन CONTINUE वर क्लिक करा.
ब्लॉगचे टेम्प्लेट निवडा
६. अशाप्रकारे आपला स्वतःचा एक ब्लॉग तयार झाला आहे. आता Get Started वर क्लिक करुन लेख, कविता, साहित्य लिहायला सुरुवात करा. म्हणजेच ब्लॉग लिहायला, ब्लॉगिंगला सुरुवात करा.
आपला ब्लॉग तयार झाला आहे. ब्लॉग लिहायला सुरुवात करा
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.