लिंक शेअर करुन पैसे कमवणे

“इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे” या मालिकेतील पहिला लेख मी आज लिहित आहे. आपण फेसबुक किंवा इतर ठिकाणी मित्रांना लिंक (दुवा) पाठवून इंटरनेटवरील उपयुक्त आणि मनोरंजक अशा पानांची नेहमीच माहिती देत असतो. अशी चांगली माहिती शेअर करण्याचा खरं तर आपल्याला स्वतःला काहीही फायदा होत नाही. पण आज आपण अशा एका वेबसाईटची माहिती घेणार आहोत की जिच्या सहाय्याने शेअर केलेल्या लिंकमधूनही पैसे कमवता येऊ शकतात. हे नेमकं कसं घडतं? ते आता आपण पाहूयात.

इंटनेटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे जाहिराती. जाहिराती आहेत म्हणून इंटरनेटवरील ज्ञानाचा खजिना खरं तर वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. जाहिराती नसत्या तर इंटरनेटवरील ज्ञान आज खूपच मर्यादित स्वरुपात असलं असतं. इंटरनेटवरील मराठीची प्रगती देखील खरं तर चांगल्या जाहिराती नसल्यामुळे खुंटली आहे. त्यामुळे मराठीमध्ये उपलब्ध ज्ञान मर्यादित स्वरुपात दिसून येतं. लिंक शेअर करुन पैसे कवण्याच्या कामात देखील आपल्याला जाहिरातींच्या माध्यमातूनच पैसे प्राप्त होणार आहेत.
आपल्या वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये आपल्याला जो पत्ता दिसत आहे, त्याला युआरएल (URL) असे म्हणतात. उदाहरणार्थ, 2know.in हे एक युआरएल आहे. कधी कधी या युआरएलची लांबी खूप मोठी असते. अशावेळी मोठे युआरएल आपल्याला लहान करता येते (शॉर्ट युआरएल). हे शॉर्ट युआरएल देखील आपल्याला त्याच पानावर घेऊन जाते जिथे आपल्याला मोठे युआरएल घेऊन गेले असते. शॉर्ट युआरएल इतरांना देणं सोपं आहे म्हणून मोठं युआरएल लहान करतात आणि त्यासाठी ‘युआरएल शॉर्टनिंग सर्व्हिस’ वापरतात.
इंटरनेटवर अशा असंख्य युआरएल शॉर्टनिंग सर्व्हिसेस आहेत. त्यांपैकी अनेक सेवा आपल्याला लहान केलेल्या युआरएल पासून पैसे कमवण्याची संधी देतात. अ‍ॅडफ्लायची युआरएल शॉर्टनिंग सर्व्हिस आणि पेमेंट सिस्टिम मला चांगली वाटते, म्हणून मी आज अ‍ॅडफ्लायच्या अनुषंगाने हा लेख लिहित आहे. एखादे युआरएल लहान करुन त्यापासून पैसे कसे कमवता येतील? ते मी आता एक एक करुन क्रमवार सांगत आहे.
अ‍ॅडफ्लायवर खाते उघडणे
१. सर्वप्रथम आपल्याला ‘अ‍ॅडफ्लाय’ या साईटवर जावं लागेल.
२. त्यानंतर आपल्याला अ‍ॅडफ्लाय या साईटमध्ये सहभागी व्हावं लागेल, म्हणजेच साईन अप (Sign Up) करावं लागेल. Join ADF.ly या बटणावर क्लिक करा. आपले नाव, ईमेल पत्ता, युजरनेम, पासवर्ड अशी माहिती भरुन Join Now वर क्लिक करा. आपले युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवा. नंतर लॉग इन (Log in) करताना आपल्याला या माहितीची गरज भासेल.
३. आपण सभासद होत असताना दिलेल्या ईमेल पत्त्यावर Account Confirmation with AdF.ly अशा आशयाचा एक मेल येईल. त्यामध्ये एक कोड असेल. तो कोड माऊसच्या सहाय्याने कॉपी करावा आणि खाली Confirmation Webpage चा जो पत्ता दिला असेल, तिथे जाऊन दिलेल्या जागेत पेस्ट करावा आणि submit वर क्लिक करावे. यानंतर आपले अ‍ॅडफ्लायवरील खाते निश्चित होईल.
मोठे युआरएल लहान करणे आणि जाहिरात प्रकाराची निवड

१. आपले युजरनेम आणि पासवर्ड वापरुन अ‍ॅडफ्लायमध्ये प्रवेश करा.
लिंक शेअर करुन पैसे कमवा
२. वर चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला वेब पत्ता टाकण्यासाठी एक मोकळी जागा (Address box) दिसेल, त्या जागेत आपल्याला आपला युआरएल टाकायचा आहे. पैसे कमवणे हा आपला इथे मुख्य उद्देश असल्याने, केवळ आकाराने मोठे युआरएल टाकले पाहिजे असं काही नाही. आपण आपल्याकडील शेअर करायचे आहे असे कोणतेही युआरएल त्या जागेत टाकू शकाल.
३. त्या मोकळ्या जागेला (Address box) लागून खाली असलेल्या more options.. वर क्लिक करा. 
४. इथे Advertising Type असा पर्याय आपल्याला दिसत असेल. त्यामध्ये Interstitial Advert, Framed Banner आणि No Advert असे तीन प्रकार आहेत.
४-अ) Interstitial Advert मध्ये जेंव्हा एखादी व्यक्ति आपल्या शॉर्ट युआरएल वर क्लिक करेल, त्यावेळी त्या व्यक्तिला काही सेकंद संपूर्ण जाहिरात पाहणे अनिवार्य ठरेल. त्यानंतरच ती व्यक्ति मुख्य पानाकडे जाऊ शकेल. या जाहिरात प्रकारात प्रत्येक क्लिक मागे अधिक पैसे मिळतात, पण अशाप्रकारची जाहिरात पाहणं हे त्या शॉर्ट लिंकवर क्लिक करणार्‍या व्यक्तिला काहीसं अडचणीचं वाटू शकतं. 
४-ब) Framed Banner मध्ये जेंव्हा एखादी व्यक्ति शॉर्ट लिंकवर क्लिक करते, तेंव्हा ती लिंक त्या व्यक्तिला थेट मुख्य पानावर घेऊन जाते, पण मुख्य पानाच्या वर जाहिरातीचा एक बॅनर दिसत राहतो. अशाप्रकारच्या जाहिरातीतून Interstitial जाहिरातीच्या तुलनेत थोडेसे कमी पैसे मिळतात, पण शॉर्ट लिंकवर क्लिक करणार्‍या व्यक्तिला अशा प्रकारची जाहिरात पाहणं हे कमी अडचणीचं आहे.
५. Domain या पर्यायामधून आपण निर्माण होणारी शॉर्ट लिंक कोणत्या Domain च्या स्वरुपात निर्माण होईल ते ठरवतो. Custom Name च्या माध्यमातून आपण नव्याने निर्माण होणार्‍या ‘शॉर्ट युआरएल’ला नाव देऊ शकतो. हे पर्याय आहेत तसे ठेवले तरी चालतील. 
६. सरतेशेवटी Shrink! वर क्लिक करा! आता आपल्याला नवे युआरएल मिळालेले असेल. Copy वर क्लिक करुन हे युआरएल कॉपी करा आणि फेसबुक, ब्लॉग, ईमेल इत्यादी माध्यमातून या युआरएलचा प्रसार करा. आपला मित्र किंवा कोणतीही व्यक्ति जेंव्हा या युआरएलवर वर क्लिक करेल, तेंव्हा आपल्याला त्याचे पैसे मिळतील. ते आपण आपल्या अ‍ॅडफ्लायच्या खात्यामध्ये पाहू शकाल. लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, हे पैसे क्लिक झाल्यानंतर तात्काळ आपल्या खात्यात जमा होत नसून, त्यासाठी काही तास वाट पाहावी लागते.
७. लिंकवर क्लिक कोठून झाला आहे? त्यावरुन देखील आपल्याला किती पैसे मिळणार? ते ठरतं. जर अमेरीकेतून क्लिक झाला तर भारतातून होणार्‍या क्लिकच्या तुलनेत बरेच अधिक पैसे मिळतात.
८. आपण जेंव्हा एखाद्या व्यक्तिला अ‍ॅडफ्लायमध्ये सहभागी करुन घ्याल, तेंव्हा आपल्याला ती व्यक्ति जितकी रक्कम कमवेल त्या रकमेच्या २०% इतकी रक्कम काहीही न करता जीवनभर मिळत राहते. त्यासाठी Refferals विभागात आपल्यासाठी एक खास लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करुन त्या व्यक्तिने अ‍ॅडफ्लायमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. यावरुन ती व्यक्ति आपल्यामार्फत अ‍ॅडफ्लायमध्ये सहभागी झाल्याचं निश्चित होईल. अशा कितीही व्यक्ति आपण अ‍ॅडफ्यालमध्ये सहभागी करुन घेऊ शकाल. 
पैसे कमवण्याची माध्यमे: ब्लॉग, फेसबुक पेज, ट्विटर
अशाप्रकारे पैसे कमवण्यासाठी लागणार्‍या माध्यमांचा आता आपण विचार करु.
ब्लॉग: आपला जर स्वतःचा ब्लॉग असेल, तर आपल्या ब्लॉगवर होणार्‍या प्रत्येक क्लिक पासून आपण अशाप्रकारे पैसे कमवू शकाल. त्यासाठी Tools वर जाऊन Full Page Script या पर्यायाची निवड करावी. तिथे दिलेल्या सुचना वाचून देण्यात आलेला दुसरा Html कोड आपल्या ब्लॉगमध्ये समाविष्ट करावा. आपल्या ब्लॉगवर होणार्‍या प्रत्येक क्लिकमागे आपल्याला पैसे मिळू लागतील. आपल्याला काही समस्या आल्यास खाली प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रश्न विचारावेत.
फेसबुक पेज: फेसबुक पेजवर आपण निरर्थक आपला वेळ वाया घालवत असतो. तेंव्हा आपले जर स्वतःचे फेसबुक पेज असेल, तर त्यापासून पैसे कमवण्याची ही सुवर्णसंधीच आहे, असं म्हणावं लागेल. आपण आपल्या फेसबुक पेजवर नेहमी काही ना काही लिंक शेअर करत असालच, तीच लिंक जर अशाप्रकारे शॉर्ट करुन जर शेअर केलीत, तर नक्कीच आपल्याला काही पैसे मिळू शकतील. आपले जर फेसबुक पेज नसेल, तर तयार करायला हरकत नाही. आपल्या फेसबुक पेजचे जितके अधिक फॅन असतील, तितका आपल्याला अधिक फायदा होईल.
ट्विटर: भारतामध्ये जरी आपण ट्विटर कमी प्रमाणात वापरत असलो, तरी जगामध्ये ही एक मोठी लोकप्रिय वेबसाईट आहे. या साईटच्या माध्यमातून देखील आपण अशाप्रकारे लिंक शेअर करुन पैसे कमवू शकाल. आपण हे काम किती हुशारीने आणि चांगल्याप्रकारे करु शकाल, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे.
कमवलेले पैसे आपल्यापर्यंत कसे पोहचतील?

पैसे आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी साहजिकच एखाद्या माध्यमाची गरज असणार आहे आणि ‘पेपाल’ हे ते माध्यम आहे. मागे आपण ‘पेपाल’चे खाते कसे काढायचे? हा लेख पाहिला होता. तेंव्हा पैसे स्विकारण्यासाठी पेपालचे खाते काढणे हे फार काही अवघड नाही. पेपालच्या माध्यमातून आपले पैसे थेट आपल्या बँक खात्यात जमा होतात. आजच्या काळात ऑनलाईन पैसे स्विकारण्यासाठी पेपालचे खाते असणे ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बरेचसे इंटरनेटचे व्यवहार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चालतात.
अ‍ॅडफ्लायच्या माध्यमातून 5$ कमवल्यानंतर (तितकी रक्कम अ‍ॅडफ्लायच्या खात्यात जमा झाल्यानंतर) आपण अ‍ॅडफ्लायला पैसे देण्याची विनंती करु शकाल. हे पैसे काही दिवसांत आपल्या पेपाल खात्यात जमा होतील. तिथून ते आपण आपल्या बँक खात्यावर जमा करु शकाल. त्यावेळच्या रुपयाच्या दराप्रमाणे आपण कमवलेले डॉलर आपणास रुपयामध्ये बदलून मिळतील.
अशाप्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कमवण्यासंदर्भातील पहिला लेख आज आपण पाहिला. लिंक शेअर करुन पैसे कमवण्यासाठी लेखक असण्याची गरज नाही. आपणास इंटरनेटवरील एखादी गोष्ट शेअर करण्याची केवळ आवड असायला हवी.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.