वाय-फाय राऊटरमधील फरक

जुन्या वाय-फाय राऊटरची रेंज कमी पडू लागली, तेंव्हा मी एक नवीन वाय-फाय राऊटर विकत घ्यायचे ठरवले. फारसा विचार न करता ज्या राऊटरला सर्वाधिक रेटिंग्ज आहेत, ते वाय-फाय राऊटर मी ऑनलाईन मागवले. अर्थात वाय-फाय राऊटर हे उत्तमच होते, पण मला ज्या प्रकारच्या राऊटरची गरज होती, ते हे नव्हते. मला मोडेमविरहीत वाय-फाय राऊटरची गरज होती, तर मी मोडेमसहीत वाय-फाय राऊटर विकत घेतले. त्यामुळे मला पुनः एकदा नव्याने हवे त्या प्रकारचे राऊटर मागवावे लागले.

दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनेट कनेक्शन करीता दोन वेगवेगळ्या प्रकारचे खास वाय-फाय राऊटर आहेत. जे लोक बीएसएनएलसारखी इंटरनेट ब्रॉडबँड सेवा वापरतात (ADSL Connection), मला वाटतं त्यांना लँडलाईनच्या वायरमधून इंटरनेट कनेक्शन पुरवण्यात येते, त्यांच्यासाठी मोडेमसहित वाय-फाय राऊटर! आणि जे लोक टाटा, टिकोना अशा इतर ब्रॉडबँड सेवा वापरतात त्यांना केबलच्या माध्यमातून इंटरनेट पुरवले जाते, तेंव्हा अशांसाठी मोडेम विरहीत वाय-फाय राऊटर!

मी स्वतः कधी बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा वापरलेली नाही. त्यामुळे वाय-फाय राऊटरमध्ये असा काही प्रकार असतो, याबाबत मी अनभिज्ञ होतो.  तेंव्हा वाय-फाय राऊटर विकत घेत असताना आपला घोळ होऊ नये म्हणून खास हा लेख लिहित आहे.

आपण वाय-फाय राऊटर घेण्याच्या विचारात असाल, तर मी आपणास D-Link कंपनीचे वाय-फाय राऊटर घेण्याबाबत सुचवेन. जे लोक बीएसएनएलसारखे ADSL कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DSL-2750U Wireless N 300 ADSL2+ 4-Port Wi-Fi Router with Modem (Black) चा विचार करावा; आणि जे केबल कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DIR-605L Wireless N Cloud Router (Black) बाबत माहिती घ्यावी.

वाय-फाय राऊटर
डी-लिंक वाय-फाय राऊटर

वाय-फायची रेंज ही अनेक घटकांवर अवलंबून असते, तेंव्हा एखाद्या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही विशिष्ट मिटरमध्ये सांगणे कठिण आहे. पण वाय-फाय सिग्नल साधारणपणे किती अंतरापर्यंत काम करेल? हे अंदाजे सांगणे शक्य आहे. वर सांगितलेल्या ‘डी-लिंक’च्या वाय-फाय राऊटरला दोन अँटेने असून या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही साधारण १५ मिटरपर्यंत (कमी-जास्त अवलंबून) आहे. मला वाटतं हे डिव्हाईस मधल्या खोलीत ठेवल्यास एका घरासाठी ही रेंज पुरेशी आहे.

या लेखाच्या निमित्ताने मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्वतःला मोबाईल व मोबाईल इंटरनेट पर्यंतच मर्यादीत ठेवू नका. इंटरनेटचा खर्‍या अर्थाने उपयोग करुन घ्यायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर आपल्या घरी अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट व वाय-फाय असणे अत्यंत आवश्यक आहे.