संगणक – गरज आणि वाटचाल

खादे काम हे आपण स्वतः आपल्यापरीने शक्यतोवर करत राहतो. मात्र एकदा काम आपल्या आवक्याबाहेर गेले की, इतरांची मदत ही घ्यावी लागते. समजा पुढे तेच काम वाढत जाऊन संपूर्ण समाजास मिळूनही पुरे करता येईनासे झाले तर? सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी प्रगत जगात अशीच परिस्थिती उद्भवली. कामाचा आवाका इतका वाढला की, त्यापुढे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडू लागले. पण ‘गरज ही शोधाची जननी आहे’, असं म्हटलं जातं. त्याकाळी निर्माण झालेल्या गरजेतूनच मानवाने संगणकाच्या (Computer) शोधाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
१९ व्या शतकात अमेरीकेतील औद्योगिक प्रगतीने गती पकडण्यास सुरुवात केली होती. काम वाढले, रोजगार वाढला, तशी स्थलांतरीतांची संख्या देखील वाढली. पर्यायाने या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. जुन्या पद्धतीने अशा अवाढव्य देशाची लोकसंख्या मोजायची, लोकसंख्येची ‘गणना’ करायची म्हणजे एक खूप मोठे काम होते. या कामात प्रचंड वेळ आणि पैसा खर्च होऊ लागल्याने हे काम मानवी क्षमतेबाहेर जाऊ लागले.
याचदरम्यान १८८० साली हर्मन हॉलोरॅथ या अमेरिकन व्यक्तिने मशिनला वाचता येईल अशा पद्धतीने ‘पंच कार्ड्स’ वर माहिती साठवण्याचा शोध लावला. हॉलोरॅथची ही पद्धत १८९० सालच्या अमेरिकेच्या जनगणनेत वापरली गेली. त्यामुळे जनगणनेची ही प्रक्रिया अगदी कमी वेळात व कमी खर्चात पूर्ण झाली. अशाप्रकारे पुढील काळात वेगवेगळ्या कामांतर्गत ‘गणना’ करण्यासाठी ‘पंच कार्ड्स’चा वापर होऊ लागला. पण सुरुवातीच्या काळात ‘गणना’ करणारी ही यंत्रे पूर्णतः ‘यांत्रिक’ (Mechanical) स्वरुपाची होती. अर्थात, या उपकरणांस वीजेची (Electricity) आवश्यकता भासत नसे.

टॅब्युलेटर
टॅब्युलेटर – १९३६ सालचे IBM कंपनीचे गणना करणारे एक यंत्र

१९११ साली हॉलोरॅथने आपल्याकडील व्यवसाय विकून टाकला व त्यातूनच पुढे IBM या सध्याच्या सुप्रसिद्ध कंपनीची सुरुवात झाली. १९३० साली आलेल्या मंदीच्या काळातही संगणक (Computer) क्षेत्रातील कंपन्या चांगला व्यवसाय करत होत्या. त्यानंतर दुसर्‍या महायुद्धाचे संकट कोसळले. महायुद्ध पेटल्यानंतर सुरुवातीचा काही काळ संगणक क्षेत्रातील प्रगती मंदावली, पण त्यानंतर मात्र युद्धाच्या प्रभावानेच संगणक क्षेत्राच्या प्रगतीस गती दिली. शत्रूंच्या सांकेतिक भाषेतील संभाषणांचा अर्थ लावण्याकरीता प्रगत संगणकाची आवश्यकता निर्माण झाली. जर्मन सेन्याचे सांकेतिक संदेश कळावेत या हेतूने इग्लंडमध्ये ‘कोलॉसिस’ हे संगणकासारखे यंत्र तयार करण्यात आले होते.
१९४३ साली महायुद्धादरम्यान अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची निर्मिती होऊ लागली. आधुनिक युद्धावजारांचा वापर करत असताना हल्याचे अचूक लक्ष्य निर्धारीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आकडेमोड करावी लागत असे. ही आकडेमोड (गणना) करणार्‍या लोकांना त्या काळात ‘कॉम्प्युटर’ (संगणक) असे म्हणत असत. पण या मानवी संगणकांची गती अपुरी ठरु लागली. शस्त्रास्त्रांच्या वापराकरीता अधिक वेगवान गणनेची गरज होती.

ईनिअ‍ॅक
‘ईनिअ‍ॅक’ संगणक
यावर उपाय म्हणून जॉन मार्कली (भौतिकशास्त्राचा आभ्यासक) आणि प्रेसपर एकर्ट (इलेक्ट्रिकल अभियंता) या दोघांनी मिळून ‘ईनिअ‍ॅक’ (ENIAC) हा विजेवर चालणारा एक मोठा संगणक निर्माण केला. हा संगणक प्रत्येक सेकंदास ५००० बेरजा, ३५७ गुणाकार व ३८ भागाकार करण्यास सक्षम होता. ‘ईनिअ‍ॅक’ हे एक आवढव्य आणि गुंतागुंतीचे असे यंत्र होते. आधुनिक संगणकामध्ये असलेले गुण जरी या संगणकात दिसत नसले, तरी वेगवान गणनेसाठी संगणकाचा उपयोग होऊ शकतो हे एव्हाना सिद्ध झाले होते. त्यामुळे खरं तर त्याचवेळी आज आपण वापरत असलेल्या अत्याधुनिक संगणकाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. 
क्रमशः

हा लेख आवडला? आपल्याला 2know.in चे फेसबुक पेजही आवडेल!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.